‘बॉम्बे वायएमसीए’चे कार्य धर्मनिरपेक्ष   

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गौरव

मुंबई : ‘बॉम्बे वायएमसीए’च्या (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) नावात जरी ख्रिश्चन धर्माचा समावेश असला तरी दीडशे वर्षांची यशस्वी वाटचाल असलेल्या संस्थेचे कार्य हे धर्मनिरपेक्ष म्हणजेच सर्वांसाठी राहिलेले आहे, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘बॉम्बे वायएमसीए’च्या कार्याचा गौरव केला.
 
जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए येथे  झालेल्या ‘बॉम्बे वायएमसीए’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ब्रिटिशकाळात ‘बॉम्बे वायएमसीए’ची स्थापना झाली. पण आजही त्यांचे समाजासाठीचे कार्य अखंड सुरू आहे. याचे श्रेय त्यांच्या स्वयंसेवकांना आणि पदाधिकार्‍यांना जाते. युवकांसाठी आणि विशेषत: क्रीडा क्षेत्राबाबतचे त्यांचे कार्य हे स्पृहणीय आहे, असे राधाकृष्णन म्हणाले.
 
जागतिक वायएमसीएच्या अध्यक्षा सोहेला हायेक म्हणाल्या, दीडशे वर्ष हा फक्त  आकडा नसून समृद्ध परंपरा आहे. शिक्षण, निवारा, आरोग्य, क्रीडा, जीवनकौशल्य, आदी अनेक क्षेत्रांमधील कार्यामुळे ‘बॉम्बे वायएमसीए’ ही फक्त एक संस्था नसून, शहराची जीवनरेखा झाली आहे. ‘बॉम्बे वायएमसीए’चे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी प्रास्ताविक केले. ‘बॉम्बे वायएमसीए’च्या दीडशे वर्षांच्या कार्यावर आधारित कॉफी टेबल बुक आणि स्मरणिककेचे प्रकाशनही यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. 

Related Articles